October 26, 2026
​जामखेड प्रतिनिधी:१४ ऑक्टोबर २०२६ ​ जामखेड नगर रस्त्यावरील एका चहाच्या दुकानात बसलेल्या राहुल अंधारे (वय ३४) या युवकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने अचानक जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात राहुल अंधारे यांचा एक हात मनगटापासून पूर्णपणे वेगळा झाला असून, या थरारक घटनेमुळे जामखेड शहरात मोठी दहशत पसरली आहे. ​नेमकी घटना कशी घडली?मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अंधारे हे नेहमीप्रमाणे जामखेड-नगर रस्त्यावरील एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी व मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी आले होते. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलमध्ये बसले असताना, अचानक दोन हल्लेखोर हातात घातक शस्त्रे घेऊन तिथे घुसले, तर तिसरा तरुण बाहेर मोटारसायकलवर ताटकळत उभा होता. हॉटेलमध्ये शिरलेल्या दोघांनी थेट राहुल अंधारे यांच्यावर वार केला. हा वार चुकवण्याचा प्रयत्न करत असताना अंधारे यांनी आपला हात पुढे केला, त्याचवेळी हल्लेखोराने केलेल्या भीषण वाराने त्यांचा एक हात मनगटाच्या वरच्या बाजूने तुटून बाजूला पडला. या भयानक प्रकारामुळे परिसरात रक्ताचा सडा पडला आणि एकच पळापळ उडाली. यानंतर तिन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले. घटनेनंतर उपस्थित काही धाडसी नागरिकांनी गंभीर जखमी राहुल अंधारे यांना, तसेच त्यांचा तुटलेला हात एका कागदी पिशवीत गोळा करून तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात (समर्थ हॉस्पिटल) दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ अहिल्यानगर (अहमदनगर) येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस आरोपींना कधी जेरबंद करतात आणि यामागील नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलाकेंद्रातील वादाची किनार? राहुल अंधारे यांच्याशी संबंधित एका कलाकेंद्रातील वादानुसार, सुमारे महिनाभरापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वीच कलाकेंद्रावरून काहीसा वाद झाल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे. याच जुन्या किंवा ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा पूर्वनियोजित हल्ला झाला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या हल्ल्याचे नेमके कारण पोलीस तपासातच स्पष्ट होणार असून पोलीस त्या दिशेने कसून तपास करत आहेत.
. “कोणालाही आणा, रस्ता देणार नाही!” वाकीत रस्ता अडवून शेतकऱ्याला धमक्या; जामखेड तहसीलदारांकडे धाव ; कारवाईची मागणी जामखेड (प्रतिनिधी): १३ऑक्टोबर २०२६जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील वाकी येथील एका शेतकऱ्याचा शेतात आणि घराकडे जाणारा जुना पारंपरिक रस्ता बेकायदेशीरपणे अडवून त्यांना धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्रस्त शेतकरी नवनाथ केशव धायगुडे यांनी जामखेडचे . तहसीलदार  यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून रस्ता मोकळा करण्याची आणि अडवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.   नेमकी काय आहे घटना?मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार नवनाथ केशव धायगुडे (रा. वाकी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांची  वाकी येथील गट क्रमांक ८४ मध्ये शेतजमीन व घर आहे. सदर शेतात आणि घराकडे ये-जा करण्यासाठी पूर्वीपासून (कायम जुना) रस्ता अस्तित्वात आहे.  हा रस्ता ज्या जमिनीतून जातो, तेथील स्थानिक नागरिक १) ज्योतीराम दत्तात्रय खताळ, २) अर्जुन बाळू खताळ, आणि ३) योगेश आनंद जगताप यांनी सदर रस्ता बेकायदेशीरपणे अडवला असल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे.   अर्जात नमूद केल्यानुसार, रस्ता बंद केल्यामुळे शेतात जाणे-येणे पूर्णपणे थांबले आहे. याशिवाय संबंधित व्यक्तींकडून अर्जदारास मानसिक त्रास दिला जात असून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. “तुम्ही कोणालाही घेऊन या, आम्ही हा रस्ता देणार नाही” अशा प्रकारची अरेरावीची भाषा वापरून त्यांना रोखले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  रस्ता अडविल्यामुळे शेतातील दैनंदिन कामे खोळंबली असून पिकांची मशागत व देखभाल करणे कठीण झाले आहे. या अडूनमुठपणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून अर्जदाराला आर्थिक व मानसिक फटका सहन करावा लागत आहे.  या प्रकरणी महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि अडवलेला रस्ता तात्काळ मोकळा करून देऊन न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी अर्जदाराने केली आहे.
error: सर्व हक्क राखीव या वेबसाइटवरील बातम्या, लेख, मजकूर, छायाचित्रे, ग्राफिक्स आणि इतर सामग्रीचे सर्व हक्क Police Warrant News यांच्याकडे राखीव आहेत. आमची सामग्री परवानगीशिवाय कॉपी, पुनर्प्रकाशित, पुनर्वितरित किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरता येणार नाही. Police Warrant News ची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या वेबसाइटवरील कोणतीही सामग्री इतर वेबसाइट, सोशल मीडिया, ब्लॉग किंवा इतर माध्यमांवर प्रकाशित करू नये.